Ticker

6/recent/ticker-posts

स्वराज्याच्या राजधानीतून, लोकशाहीचा नवा आवाज : रायगडचा भूमिपुत्र

स्वराज्याच्या राजधानीतून, लोकशाहीचा नवा आवाज 

'रायगडचा भूमिपुत्र'

सप्रेम जमहाराष्ट्र ! आज गुरुवार, दिनांक १९ मार्च २०२६ हिंदू नववर्षाचा नवीन दिवस म्हणजे गुढीपाडवा ! माणसाने पुन्हा पुन्हा सर्वांच्या हिताचे परंतु आपल्याला आवडणारे काहीतरी करण्याचा संकल्प सोडण्याचा आणि तो पुढच्या काळात अंमलात आणण्याचा शुभ दिवस.   

मी बबन शेलार, पोलादपूर तालुक्यातील भूमिपुत्र ! अनेकांना पत्रकारीता आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून माहिती असलेला चेहरा.  

मी आज रायगडचा भूमिपुत्र या ब्लॉगच्या माध्यमातून रायगडवासीयांसमोर विशेषतः महाड-पोलादपूर वासियांच्या समोर सोशल मीडियाच्या माध्यमातून येत आहे. आपण माझ्या या भूमिकेचे स्वागत कराल अशी खात्री आहे. 

आजच्या माहितीच्या महापुरात आमची भर कशासाठी?" असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आज प्रिंट मीडिया असो वा इलेक्ट्रॉनिक मीडिया, बातम्यांचा पाऊस चोहोबाजूने पडत आहे. पण या गदारोळात रायगडच्या मातीचा खरा गंध, येथील सामान्य माणसाचे प्रश्न आणि आपल्या महान परंपरेचा वारसा कुठेतरी हरवताना दिसतोय. म्हणूनच, केवळ 'बातमी' देण्यासाठी नव्हे, तर समाजहिताची वैचारिक बाजू मांडून 'बदल' घडवण्यासाठी 'रायगडचा भूमिपुत्र' हे व्यासपीठ आजपासून जन्म घेत आहे.

आमची प्रेरणा: शिवरायांचा आदर्श

रायगड ही केवळ एक भौगोलिक सीमा नाही, तर ती एक 'सुवर्णभूमी' आहे. ज्या मातीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन होऊन जगाला स्वराज्याची ओळख करून दिली, त्याच मातीचा वारसा पुढे नेणे हे आमचे कर्तव्य आहे. शिवप्रभूंनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन शून्यातून विश्व निर्माण केले. तोच 'सबका साथ' देणारा आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही वाटचाल करणार आहोत.

काय असेल 'रायगडचा भूमिपुत्र' मध्ये?

आम्ही केवळ हेडलाईन्स देणार नाही, तर रायगडच्या सर्वांगीण विकासाचा आरसा होऊ इच्छितो:

ऐतिहासिक वारसा: गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि महान इतिहासाची मांडणी.

सामाजिक भान: तळागाळातील उपेक्षितांचे प्रश्न आणि सामाजिक सलोख्याचे प्रयत्न.

आरोग्य व शिक्षण: जिल्ह्यातील शैक्षणिक सुविधा आणि आरोग्य यंत्रणेतील त्रुटी व प्रगतीवर भाष्य.

राजकीय विश्लेषण: राजकारण केवळ सत्तेसाठी नव्हे, तर समाजकारणासाठी कसे असावे, याचा मागोवा.

कृषी आणि उद्योग: रायगडच्या शेतकऱ्यांच्या व्यथा आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी.

हा लढा विचारांचा !

'रायगडचा भूमिपुत्र' हे केवळ एक नियतकालिक किंवा माध्यम नसेल, तर तो प्रत्येक रायगडकराचा आवाज असेल. प्रस्थापितांच्या गर्दीत विस्थापितांचे प्रश्न मांडण्यासाठी, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि आपल्या जिल्ह्याच्या गौरवासाठी आम्ही लवकरच येत आहोत.

आमचा विश्वास आहे, रायगडची ही सुवर्णभूमी पुन्हा एकदा आपल्या विचारांनी उजळून निघेल!

लवकरच येत आहोत... तुमच्या हक्काच्या व्यासपीठासह !

बबन शेलार (मुख्य संपादक )

संपर्क : ८०८०८४०२०८

ईमेल : bshelar891@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या